बापू !
तुमच्या जाण्याने
देश इतका दुर्बल होईल
असे वाटलेच नव्हते कधी.
प्रश्न पडतो,
दर्यासारख निर्धास्त अन निर्भीड असलेलं
तुमचं जाणतेपन
इतकं असूच कसं शकतं क्षणभंगुर ?
प्रत्यक्षात,
कधी झालीच नाही आपली नजरानजर.
आई-बाबा अन
शाळेतील गुरुजींनी सांगितलेल्या गोष्टींमुळे
एकदमच चालून आलं
असं अकाली डोळसपन
अन् तुम्ही उभे झालात आमच्या समोर
पँसिफिक सारखे....
बापू !
तुमच्या,
निर्दोष जाणिवांच बोट धरूनच
आम्ही सुरु केला जीवनप्रवास.
वाटलं,
सुर्यासारख्या तुमच्या तेजस्वी सहवासाने
आम्हालापण मिळेल
एक स्वयंप्रकाशीत आभाळ,
वास्तवात मात्र वेगळंच राजकारण
एकदमच कळलं,
तुमचं निराकार छत्र पारख झालंय आम्हाला
केव्हाचच,
स्वातंत्र्याची जागा आता स्वैराचार घेऊ लागलाय
दिवसेंदिवस.
फोफावलं इथे,
दंगलखोर,भ्रष्टाचारी अन बलात्कार्यांच
साम्राज्य....
बापू !
तुमचे आणि बाबांचे मतभेद
आता मनभेद करण्यासाठी
सर्रास वापरण्यात येत आहेत
शस्त्र म्हणून.
हे बघून,
बाबांना सुद्धा खंत वाटत असेल त्यांच्या कर्तृत्वाची.
त्यांनी बोलावली असेल नवीन बैठक
नवा मसुदा लिहिण्यासाठी स्वर्गातच,
खात्री आहे !
तुमचा सल्ला न घेण्याची घोडचूक
ते करणार नाहीत नव्याने
कारण त्यांना यावेळी,
माणसांसाठी लिहायचंय
संविधान.....
बापू !
तुम्ही सुद्धा
एखाद्या पंथाचे
पायीक व्हायला हवे होता त्यावेळी.
निदान,
त्यांनी तरी तुमचा पाठपुरावा केला असता
पुराव्यानिशी.
दगडांना शेंदूर फासणाऱ्यांच्या या देशात
माणसांसाठी झटणाऱयांना,
मातीचच मोल असतं.
हे कळलंच कस नाही तुमास्नी ?
बापू !
तुमचे बुनियादी शिक्षण झालेय
तुमच्या आश्रमातच बंदिस्त.
अन् आम्ही शिकार व्हायला लागलो
शैक्षणिक कँपन्यांचे.
आता व्यवहारांचीच पायाभरणी होऊ लागलीय
मस्तकात.
होत आहेत,
आमचे संस्कार
आमच्या संस्कृतीतच दफन.
फक्त शरीर तेवढे शाबूत आहे म्हणून सांगा,
मेंदूंनी तर कायमचंच स्वीकारलंय
पारतंत्र्य....
बापू !
तुमचा अहिंसेचा मार्ग,
हि चक्क पळवाट वाटतेय तुमच्या
तरुणांना.
"मजबुरी का नाम महात्मा गांधी"
हि म्हण सुद्धा फेमस करून टाकलीय
त्यांनी त्यांच्यातच.
यांच्या यातना बघून
तुमच्या आत्म्यात जी कळ उठायची
आतल्या आत
आज तिलाच चुरगळून ते करत आहेत
तुमच्या तस्वीरीला
रक्तबंबाळ....
बापू !
आमच्या अस्तित्वाचं गाठोडं घेऊन
कदाचित तुम्ही मृगजळातच धावत होता.
कारण चार हौशी सोडले तर,
इथे कुणालाच भ्रांत नाही तुमच्या प्रतिमेची.
नोटांवर छायांकित करण्यात यावा,
इतका फोलकट नव्हता तुमचा मोठेपणा कधीच.
ऐकिवात आहे,
तुमच्यातील भाईचारा आकर्षित करायचा,
जिंदादिल माणसांच्या जीवंत मनास.
कळायचय लोकांना अजून कि,
पैशाने फक्त भाडोत्री तट्टुंनाच खरीदायच असतं.
बाजारात विकायला ठेवलेलं नसतं
अभिजात माणूसपण.....
बापू !
तुमचं सत्य,
हल्ली दुतोंडी बाहुल्यासारखं झालयं.
कुठल्याही पांढरपिशयाच्या हातात असतो
रिमोटकंट्रोल.
जबानी दिली कि, "खेल खत्म"
इतका मर्यादित झालाय अमर्याद खरेपणा.
तुमचा हरीशचंद्र सुद्धा हंगामीच झालाय आजकाल,
'ऊस टाकला कि लगेच कूस बदलणारा'....
बापू !
धर्माचं मॅग्नेट वापरून चालवत आहोत आम्ही,
एकमेकांच्या फारकतिंची मोहीम आतल्या-आत.
एक ना अनेक नामी व्यक्तींचे
कॉपिराईट्स,
वाटून घेतलेय,आम्ही आमच्यातच.
मन्दिर,मस्जिद अन विहारांची उंची,
आसमंतास भिडावी म्हणून.
जगभर "ग्रेट पर्सनॅलिटी" म्हणून,
ख्यातनाम असलेले तुम्ही,
कोणत्या "ग्रुपला" "जॉईन" व्हायचं,
हे तुमचं तुम्हीच ठरवा वरचे-वर.
माणुसकी शिवाय दुसर्या धर्माची,
पाठराखण केली नाही,
म्हणून तुम्हाला हि सवलत....
बापू !
बरे झाले,
भगतसीह, राजगुरु व सुखदेवांच्या सुनावणीला
तुम्ही होता.
देशप्रेम अन् माणूसपण
एकाचवेळी समोर आलं फिरंगी मातेफिरूंच्या.
एखाद्याने फितुरी करून,
आपली नालायकीच सिद्ध केली असती
नाहीतरी.
निदान गोर्यांना कळून तरी चुकले
कि,आपण लायक झालोय स्वातंत्रयाच्या.
या क्रांतिवीरांचे बलिदान,
व्यर्थ जाण्याचा प्रश्नच नव्हता.
कारण त्याच वेळी घनन्दीशी फिरला,
वन्देमातरमचा घण्टानाद,
फिरंगी जल्लादांच्या काणशिलांवर.
दुर्दैवाने,
तुम्ही मात्र कायमचं वाहात आहात,
न केलेल्या खुणांच ओझं.
फक्त अन फक्त तुमच्या
देशबांधवांसाठी.....
बापू !
तुमच्या शांततेच्या धोरणाला,
केव्हाचीच लागलीय उतरतीकळा.
अन् आम्ही पुरस्कर्ते झालोय चंगळवादाचे.
धर्मभेद,जातीभेद,वंशभेद,वर्णभेद.
खुनाऊ लागलेत आम्हाला राजरोस.
कधीकधी वाटतं,
तुम्ही नाहीत हेच बरे झाले.
तुम्हाला खरच पहावल नसतं,
अथक प्रयत्नानी मिळवलेल्या अद्वैताच
असं अकस्मात झालेलं पतन....
बापू !
खरं तर,
तुम्ही जायलाच नको होतं,
आमच्या नजरेआड असं निमिषार्धात.
आज पोरकाच वाटूलागलाय,
अखंड "हिंदुस्तान"तुमच्याशिवाय.
तुम्ही गेलात,
अन् खितपत पडलीय,
तुमची रामराज्याची संकल्पना,
सरकारी दस्ताऐवजात.
आमच्यासारखे चितारु पाहतात
तुमचे रामराज्य,
कल्पनेतल्या-कल्पनेत.
पण आमचा प्रयत्नही तसाच,
पोरकट.
म्हणून म्हणतो,
जमलं तर याच.
एकदा बघायचंय असं सोनेरी स्वप्न
डोळ्यादेखत साकार होतांना.
अन्यथा,
चेंगराचेंगरी,लूटमार अन रक्तपात.
असाच असेल.
तुमच्या स्वप्नातला आमचा,
भारत.......
नीरज पुरुषोत्तम चौधरी
15/12/2015