Sunday, 19 September 2021

शोध

डोळ्यांखाली आकार घेणारी वर्तुळं बघून
कुणीतरी विचारलाच प्रश्न
तो प्रश्न होता की
घालमेल होती कुणाच्या अस्वस्थ मनाची
हे सांगणे अवघडच
पण एक मात्र खरे की
त्या निनादाने पायाखालची जमीन विदीर्ण व्हायला क्षणाचाही विलंब लागणार नव्हता

तसं पहिल्यांदाच नव्हतं घडत आयुष्यात असं काही
या आधी पण उतरायचेच काही क्षण
घड्याळीच्या पंखांवरून 
आपल्या वर्तुळाकार आयुष्याची आठवण करून देण्यासाठी
मग असाच निघून जायचा वेळ
हृदयागारातील आरश्यामध्ये तासनतास डोकावून पाहताना

माथ्यावर चढलेले ढग 
एकमेकांची खुन्नस काढण्यासाठी 
प्रचंड धावाधाव करत आहेत आज
कोण काय शोधतोय कुणाचे कुणालाच ठाव नाही
मनातला पाझर
की पापण्यांतील पाणी
पहाटेचे गीत
की विरहाची गाणी
हा ज्याचा त्याचा प्रश्न

आज होऊ देत आतबाहेर कालवाकालव कितीही
होऊ देत आठवणींचा उल्कापात 
निर्जीव दगडांच्या कानशीलांवर
मी मात्र खचनार नाही
वादळाच्या रथात बसून 
जाणिवांच्या चक्रव्यूहात घुसायचय मला
अन शोध घ्यायचाय अभिमन्यूच्या अपयशाचा
खचलेला आत्मविश्वास
की तालमेचा आभाव
अत्युच्च प्रेम
की वायफळ अहंभाव
सारेच प्रश्न अनुत्तरित

निरज पुरुषोत्तम चौधरी
वर्ष- 2015




Friday, 17 September 2021

पारवा

कधी ओसाड जागीचा अनाहूत पारवा झालो
तुझ्या आभाळल्या नजरेतला मी गारवा झालो

तुझ्या श्वासातले संगीत आहे जोगीया माझा
तुझ्या ओशाळल्या मुद्रेतला मी मारवा झालो

तुला न्याहाळताना जिंदगीचा केवडा झाला
तुझ्या वेणीतल्या गजऱ्यातला मी मोगरा झालो

मनाचे फुल झाले अन तयांनी गलबला केला
खुळा मजनू म्हणाले अन म्हणे मी बावरा झालो

ऋतु उलटून जाताना मनी हुरहूर सूर झाली
जणू विरहातल्या गाण्यातही मी केरवा झालो

निरज पुरुषोत्तम चौधरी
१८/०९/२०२१
रात्री ३:०३ मिनिटांनी

घर

चिमुकल्याश्या फांदीवरती  कुणी थाटले नाजूकसे घर  किमया काय म्हणावी त्याची  कोण म्हणावा किती कलन्दर  तातुर-मातुर कुठले काही  चोख विनाई चोख शिल...