नाविणन्याच्या उंबरठ्यावर
गतजन्माची जाण कशाला?
आज असो अपमान असू दे
पूर्वीचा सन्मान कशाला?
पर्ण मनाचे जीर्ण होउदे
विदीर्ण साऱ्या भाव भावना
भंग होऊदे षंढपणा अन
उकिरड्यातल्या विषय वासना
अहंपणाचा फाजील वारा
चुटकी सरशी पार विरुदे
लोळुन झाली संभ्रम शय्या
वास्तव थोडे हवे उशाला...
आज फासला तोच फासू दे!
शेंदूर सार्या भग्नपणाला,
विपर्यास हा माणुसकीचा
अधिक नागडे नग्नपणाला,
हवे तेवढे चोपून घेणे
तेल तरतरी येण्यासाठी
शोषून झाले रक्त अताशा
कोरड कसली आज घशाला...?
पाडून झाले खांब तनुचे
अजून तरीही श्वास गर्जतो
पाऊस रुसला नक्षत्राचा
नेत्रघनांतुन चिक वर्षतो
निसर्गवारे पसार सारे
अमुच्या हाव वखारी भरता
अंधाराने कात टाकली
उजेड सारा सरु लागला...
काल गोधडी भर्जरी जरी
आज फाटके वर्तमान हे
मावळतीच्या चंद्रकोरीला
अज्ञान्याचे अर्ध्यदान हे
रित्या ओंजळी पुढच्यासाठी
भरुनी सार्या रित्याच आहे
मोजमाप हे आयुष्याचे
आज घेऊदे या घटकेला...
आजच करणे काहीबाही
परिवर्तन वा असो तबाही
आसमंत हा थिटा पडो पण
जगण्यासाठी एक चढाई
जाऊन सांगा आज उषेला
शृजनाचा हा फतवा आला
ध्येय्य आमुचे बलवत्तर हे
अमुचे जीवन उजळायाला...
नीरज पुरुषोत्तम चौधरी
15/08/2014
No comments:
Post a Comment