अशा विवस्त्र तावदानांची
चीड येतेय मला,
वाटत राहतं ,
कुणीतरी डोकावून पाहतेय
आपल्या शय्यागारात,
आपल्या मनाची परवानगी नसताना.
शेजारच्या कॉलनीतून कधीकाळी निमूटपणे
वाहत जाणारा वात,
जेव्हा मुद्दामच आपल्या कक्षेत येऊन उद्दामपणे एखाद्या
तिऱ्हाईता सारखा जात असतो खेटून,
तेव्हा अचानकच होत असतो एखाद्या उपद्रवी चिलाटीने
नको तिथे वरफांडे फाडल्याचा
नको नकोसा भास.
कुणीतरी जाणीवपूर्वक
आपल्या आयुष्यात 'ऊंगली' करावी
आणि अकस्मात आपलं सर्वस्व बेचिराख व्हावं
नाही म्हटलं तरी
हा आपल्याच आप्तेष्टांनी जुळवून आणलेला
एक अनिश्चित
योगायोग.
नात्याच्या महाकाय वृक्षाखाली
आपल्या हक्काची टीचभर
सावली शोधत असताना,
प्रत्येकानं सढळ हाताने दिलेली कानपिचकी
अजूनही नाहीच करता येत
नजरेच्या भिंतीपल्याड.
आपण होऊ घातलेल्या
'मिशन सहृद्यतेला' असं मूठमाती देऊन
मला नाही होता येणार
तू झाला तसे नामानिराळे,
किंवा पेलताही नाहीच येणार
संस्कारांच्या नावाखाली मानगुटीवर
जबरदस्तीने लादलेला
प्रतिगामी बलून.
मी खरचं
निघू पाहातेय,
एका नवीन क्षितीजाच्या शोधार्थ,
नव्या उमेदीने,
नव्या प्रदेशांच्या नव-नवीन पानवठ्यांवर,
अन् साकारू पाहातेय
एक 'रंगीत' चित्र,
या निराशेच्या धुलिकणाआड
मी मलाच पाहातेय शोधून,
अशा निर्णायक वेळी,
मलाच-- माझ्याशी-- भेटता-- यावे-- म्हणून...
नीरज पुरुषोत्तम चौधरी
17/6/2017
No comments:
Post a Comment