Wednesday, 16 October 2019

आयुष्याच्या वळणावरती

आयुष्याच्या वळणावरती

आयुष्याच्या वळणावरती
असले काही जुळून यावे
जगता जगता मरणाचेही
गुपित आम्हा कळून जावे

आयुष्याच्या वळणावरती
घडून थोडे जावे हातून
लाचारांच्या पोटासाठी
कणभर दाणे द्यावे ओतून

आयुष्याच्या वळणावरती
मिटून जावे भांडण तंटे
माझे मीपण वाहून वाहून
कळले आपण किती करंटे

आयुष्याच्या वळणावरती
जातपातही पुसल्या जावी
अखंड मानवतेला ताळा
आपुल्या हाती त्याची चावी

आयुष्याच्या वळणावरती
आपुलकीला यावे आंदण
प्रत्त्येकाच्या हस्तावरती
नात्यासाठी नवीन कोंदण

आयुष्याच्या वळणावरती
आयुष्याला भरती यावी
मृत्यनेही मरता मरता
हीच भैरवी म्हणून घ्यावी

नीरज पुरुषोत्तम चौधरी
16/6/2017

No comments:

Post a Comment

घर

चिमुकल्याश्या फांदीवरती  कुणी थाटले नाजूकसे घर  किमया काय म्हणावी त्याची  कोण म्हणावा किती कलन्दर  तातुर-मातुर कुठले काही  चोख विनाई चोख शिल...