Wednesday, 16 October 2019

भाकर

भाकर

भल्या पहाटेच
डोक्यावर शेणाचं घमेले घेऊन
बाप रोज निघतो,
विल्हेवाट लावायला
शेणाची अन मनाचीही....

चुलीत धसुन
लगबगीनं
भाकर थापणारी माय,
उल्यावर रटरटनारी
लालभडक कांदा-मिरची,
चांबट ओल्या गोवरीतून निघणारा
पांढरा शुभ्र धूर,
अन पहाटेच्या दिवस्वप्नात
ढगांच्या भाऊगर्दीत
मला बिलगून बसलेलं
एक गुबगुबीत आभाळ.
नेहमी सारखच....

संध्याकाळचं,
गावभर उंडारून आल्यावर
पुस्तकात डोकं खुपसण्याचा
माझा नाटकी वजा प्रयत्न,
दिवसभर्याच्या ढूशांनी
कोपर्यातल्या खाटेवर
जीर्ण होऊन
सैरभैर पडलेला बाप,
विझत्या सर्पणात
फुंकर घालुन-घालुन
मेटाकुटीला आलेली माय,
सर्व-सर्व नेहमी सारख.....

आजचा दिवसही
नेहमीसारखाच,
तेच शेण, तेच मन,
तिच चुल, तिच भाकर,
तोच कांदा,तिच मिरची.
फक्त,
ताटलीतली
गरम झणझणीत भाकर तोडतांना
बापाच्या हाताला
चर्रर्रर्रर्र दिशी लागणारा चटका,
मायच्या पापण्यांखालून
भळभळा ओघळणारा
आसवांचा अदृश्य ओहोळ,
अन माझ्या कुशीतून
शिताफीने निसटणार
तेच गुबगुबीत आभाळ.
इतकाच फरक...

नीरज पुरुषोत्तम चौधरी
चिंचमंडळ, यवतमाळ
भ्रमणध्वनी: ७०६६१२२९६२

No comments:

Post a Comment

घर

चिमुकल्याश्या फांदीवरती  कुणी थाटले नाजूकसे घर  किमया काय म्हणावी त्याची  कोण म्हणावा किती कलन्दर  तातुर-मातुर कुठले काही  चोख विनाई चोख शिल...