कवितेस..
कवी झुरतो,झरतो,सरतो रोजच,
अन् तू जन्म घेतेस,
तू मागत नाहीस दाद,
घालत नाहीस वाद,
तू फक्त सांगत सुटतेस,
तुझ्या अस्तित्वाची कथा,
अनुभवाची गाथा,
अन जन्माची कहाणी,
तटस्थपणे.
तुझ्या शाश्वत इतिहासाचा
पाठपुरावा नकोय आम्हाला.
नकोच आम्हाला तुझ्या अनुभवाचे
सखोल वर्णन.
तुझी उत्पत्ती,
तुझा उदय.
कवी जळतो.
अन् तू जन्म घेतेस
धुमसत जाणााऱ्या
निखाऱ्या मधून
ती झळ,ती कळ तेवढी व्यक्त कर.
तू फक्त तुझ्याबद्दल नको बोलूस.
तू कविबद्दलही बोलायला हवं,
सांगायाला हवा त्याचा निर्णय,
त्याचा निश्चय,त्याचा निर्धार....
त्याच्या वर्तमानाचा
आढावा हवाय आम्हाला
तुझ्या इतिहासा ऐवजी.
तो मेलाय कि जिवंत आहे
आग ओकत अजूनही..?
क्षेमकुशलतेचा
समाचार मात्र देऊ नकोस,
निदान आम्हाला तरी...
तसे असते,
तर तुझ्या ऐवजी,
तोच उभा असता आमच्यासमोर...
आमच्या
पांगळ्या अस्तित्वाचा
पुरावा घेऊन.
तो इतिहास कधीच सांगत नव्हता.
उत्पत्ती अन् उदय तर नाहीच नाही.
तो स्वतःलाच समजायचा
आमच्या व्यक्तित्वाचा वारसदार,
आणि भांडत सुटायचा,
तुझ्या,आमच्या,सगळ्यांच्या
समानतेचा प्रश्न घेऊन.
मांडत बसायचा,
तुझी,आमची,सगळ्यांचीच दुखणी.
समर्थपणे.
"वेळ आलीच तर धिक्कार करू.
आकाश पाताळ मुठीत धरू.
झालाच तर होऊ देत स्फोट.
जिवंन्त माणसांच्या ज्वलंत मनांचा.
पेटू देत वणवा जगभर,
माणूस म्हणवण्याच्या हक्का खातर.
फक्त जनावर म्हणणं थांबवाव त्यांनी.
एवढाच मुद्दा."
असा बेफाम बोलत सुटायचा.
बेबंद,बेभान वादळागत.
तो
भरवायचा मैफिली
करायचा विद्रोह
चालवायचा फिर्यादी
अन् उचलायचा आसूड
विकलांग व्यवस्थ्येच्या
विकाराविरुद्ध.
तुझ्या ऐवजी त्यालाच पाठव,
शक्य असेल तर.
नाहीच ऐकले, तर सांग त्याला,
काही प्रश्न उरलेत म्हणावं.
पुन्हा संप,पुन्हा मोर्चे ,
पुन्हा एल्गार.
त्यालाच करायचेत.
नव्या कवितेच्या
उत्पत्तीपर्यंत...
नीरज पुरुषोत्तम चौधरी
23/02/2016
No comments:
Post a Comment