Monday, 28 June 2021

फोटो

तिच्या फोटोसाठी बघा
किती आटा-पिटा होतो
फोटो मिळेना तोवरी
राग खोटा खोटा येतो...

राग लटका घडीचा
तरी डोळेझाक होते
आठवांच्या पल्याडून
मग आर्त हाक येते...

असा फोटोसाठी कोणी
कसा करलं तांडव
तिच्या फोटोमधी उभा
त्यांच्या स्वप्नीचा मांडव...

त्यांच्या स्वप्नीचा मांडव
तिला कळून चुकले
जाणिवेच्या तळाखाली
किती अंदाज हुकले..

असे अंदाज हुकता
चुकतात किती वाटा
सल येते काळजात
ह्रदयात येतो काटा...

असा हृदयीचा काटा
फार विखारी जालीम
दुःख खोलवर द्यावे
त्याला असते तालीम...

त्याला असते तालीम
असा घुमला आवाज
किती फोटोमधी मीही
केला होता गडे साज...

त्याच्या नजरेने तीन
जेव्हा फोटो बघितला
ओलं चढली लोचनी
देह चिंब- चिंब झाला...

देह चिंब चिंब झाला
पाझरली आठवण
किती विकल मनाने
केली होती पाठवणं...

पाठवणं ती पाळीव
असे खुणावते काही
कळ उठते उरात
मचतसे त्राही त्राही...

असा होयी त्राहिमाम
वेडावल्या काळजाचा
हरएक आठवण
परिमळ कापराचा...

येई कापराचा गंध
किती नितळ जाणीव
फोटो पाठव तुझ्यात
नच कोणती उणीव...

नसे कोणती उणीव
तिच्या पल्याडते गाव
होई सुरू कुजबुज
असा तरल तो भाव...

नीरज पुरुषोत्तम चौधरी
०३/०१/२०२०

No comments:

Post a Comment

घर

चिमुकल्याश्या फांदीवरती  कुणी थाटले नाजूकसे घर  किमया काय म्हणावी त्याची  कोण म्हणावा किती कलन्दर  तातुर-मातुर कुठले काही  चोख विनाई चोख शिल...