Tuesday, 29 June 2021

सिसिफस

मनाची
निगरगट्ठ गाठ पाडून
आठवणींचं 
कायमस्वरूपी बोचक
खोलवर कुठेतरी
क्षणांच्या अडगळीत
डांबून ठेवतो
आम्ही...
पावसाच्या
असंच कधितरी
मुसळधार
बरसल्याने
मग अचानकच होऊ लागतो
आम्हास भूतप्रीतीचा
अभूतपूर्व आभास...

अपेक्षांचे 
असंख्य ओंडके
आसवांच्या बेफाम समुद्रात
वाहावत जाण्याची
आम्हाला 
अजूनही वाटतच असते
अनेकवेळ एक
अनावृत्त भीती....           

मर्मस्पर्शाचे
अनेक अगणित डोहाळे
घेऊ लागतात आमच्या
नेत्र पालव्यांमध्ये
त्यांना हवा तसा
महाकाय
शाकार...

विचार आणि विकारांची
अविरत घुसळण
त्याच त्या वाटेचा
असम्बद्ध आढावा,
तरीही,
स्वप्नांच्या निलसागरात
हिंदोळत असतो
आमचा हिकमती
पडावं....

आयुष्याचा
'सिसिफस' होत असतांना
सोबतीने असलेली
अशी अनासक्त जीविशू
एवढाच काय तो
आमच्या जीविताच्या
भावसभेचा
मूलाधार...

नीरज पुरुषोत्तम चौधरी
1/05/2017

No comments:

Post a Comment

घर

चिमुकल्याश्या फांदीवरती  कुणी थाटले नाजूकसे घर  किमया काय म्हणावी त्याची  कोण म्हणावा किती कलन्दर  तातुर-मातुर कुठले काही  चोख विनाई चोख शिल...